भारतीय स्वातंत्र्याच्या संघर्षाचा इतिहास हा सहसा अहिंसक चळवळीच्या दृष्टिकोनातून सांगितला जातो, तरीही वसाहतवादाविरुद्ध सशस्त्र प्रतिकाराची गाथा तितकीच महत्त्वाची ठरते. स्वातंत्र्यवीर सावरकर, अरविंद घोष, रासबिहारी बोस, बाघा जतिन, सचिंद्रनाथ सान्याल, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आणि सुभाषचंद्र बोस ही नावे आजही भारतीय जनमानसाच्या स्मृतिपटलांवर कायम आहेत. त्यांच्या कथा एका व्यापक चळवळीचा भाग म्हणून नव्हे, तर सहसा वैयक्तिक शौर्याच्या स्वरूपात मांडल्या जातात. या चळवळीचा व्यापक रणनीतीवर किंवा स्वातंत्र्याच्या एकूणच लढ्यावर मोठा प्रभाव पडला होता. प्रत्यक्षात, क्रांतिकारक एका मोठ्या नेटवर्कचा भाग होते आणि या नेटवर्कच्या माध्यमातूनच त्यांनी तब्बल अर्ध्या शतकापर्यंत ब्रिटिश साम्राज्याचा सशस्त्र प्रतिकार केला होता. त्यांनी केवळ भारतातच आपले व्यापक नेटवर्क उभे केले नव्हते, तर ब्रिटन, फ्रान्स, थायलंड, जर्मनी, पर्शिया, रशिया, इटली, आयर्लंड, अमेरिका, जपान आणि सिंगापूर या देशांमध्येही त्याचा विस्तार करण्यात आला होता. स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेण्यासाठी आपल्या महान पूर्वजांनी आपलं सर्वस्व कसं समर्पित केलं, याचा अतिशय उत्कृष्ट संशोधनपर वृत्तान्त म्हणजे हे पुस्तक होय.